
रोखठोक मराठी न्यूज
चाकण : चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून एमआयडीसीतील रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्याला प्रतीकात्मकरीत्या ‘देव’ मानून त्याला दुग्धभिषेक करून पूजा करण्यात आली. खड्ड्याला हळदी-कुंकू वाहून अभिषेक करण्यात आला. रस्त्यांची अवस्था प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात उद्योजकांसह तीर्थक्षेत्र देहू, भामचंद्र डोंगर आणि भंडारा डोंगर परिसरातील वारकरी संप्रदायातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत उपोषणाला पाठिंबा दिला. त्यामुळे आंदोलनाला सामाजिक आणि धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.
एमआयडीसीतील रस्त्यांची दयनीय अवस्था चाकण एमआयडीसी हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर असून, दररोज हजारो कामगार आणि वाहनांची येथे वर्दळ असते. मात्र, एमआयडीसीतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे कामगार, उद्योजक, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मूलभूत सुविधांचा अभाव उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. पाणीपुरवठा, वीज आणि दर्जेदार रस्ते यांसारख्या सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक मालमत्तेची होणारी हानी आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.