साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा मुठे नीट परीक्षेत यशस्वी; ४०९ गुणांसह महाविद्यालयाची पहिली विद्यार्थिनी.

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

राजगुरुनगर : राजगुरुनगर (ता. खेड) येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील कला शाखेच्या द्वितीय वर्षात अर्थशास्त्र विषयाचे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञा भीमराव मुठे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) २०२६ मध्ये ४०९ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशामुळे नीट परीक्षेत यश मिळवणारी ती महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिली विद्यार्थिनी ठरली असून, तिच्या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प्रज्ञा मुठे ही कला शाखेत शिक्षण घेत असतानाच वैद्यकीय शिक्षणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून नीट परीक्षेची तयारी करत होती. नियमित अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर तिने या कठीण समजल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. विशेष म्हणजे कला शाखेत शिक्षण घेत असतानाही तिने नीट परीक्षेत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रज्ञाच्या या यशाबद्दल खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, सचिव हरिभाऊ सांडभोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जगताप, कला विभागप्रमुख प्रा. शशिकांत बुरुड, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. तुषार वेहळे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. आरती इंदाईस, तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. स्नेहल आदक यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रज्ञा ही जुन्नर येथील कोपरे-जांभुळशी येथील माजी सरपंच भीमराव मुठे यांची कन्या आहे. ग्रामीण भागातून येत असूनही तिने कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, शिक्षक आणि महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाला दिले आहे. भविष्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनत ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा तिचा मानस असल्याचे प्रज्ञाने सांगितले. तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *