राजगुरुनगर (प्रतिनिधी) राजगुरुनगर (ता.खेड ) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक पोलीस ठाणे इमारतीसाठी संरक्षण भिंत, फर्निचर व अन्य आवश्यक सुविधांच्या कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत ₹२ कोटी ५२ लाख ४९ हजार ९४० इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
राजगुरुनगर पोलीस ठाण्याची जुनी इमारत वाढत्या लोकसंख्येच्या आणि पोलिस प्रशासनाच्या गरजांच्या तुलनेत अपुरी ठरत होती. त्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम व आधुनिक पोलीस सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांतून सुमारे ₹६ कोटी खर्चून अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन पोलीस ठाणे इमारत उभारण्यात आली.मात्र, इमारतीच्या बांधकामानंतर संरक्षण भिंत व आवश्यक फर्निचरसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध न झाल्याने ही इमारत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास अडथळे निर्माण झाले होते.
संरक्षण भिंती अभावी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता, तर फर्निचर नसल्याने कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात अडचणी येत होत्या. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही इमारत गेल्या दोन वर्षांपासून वापराअभावी पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकली नव्हती.ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत संरक्षण भिंत व फर्निचरसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत ₹२.५२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर निधीतून पोलीस ठाणे परिसराभोवती संरक्षण भिंत उभारणे, आवश्यक कार्यालयीन फर्निचर उपलब्ध करून देणे तसेच इमारतीच्या पूर्ण कार्यान्वयनासाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन पोलीस ठाणे लवकरच पूर्णपणे सज्ज होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित, सक्षम आणि आधुनिक पोलीस सेवा उपलब्ध होणार आहे.
याबाबत बोलताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, “राजगुरुनगर परिसराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन पोलीस ठाणे उभारण्यात आले होते. मात्र आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नव्हते. आता निधी मंजूर झाल्याने उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण होतील आणि नागरिकांसह पोलिसांनाही आधुनिक सुविधांचा लाभ मिळेल.”या निधी मंजुरीमुळे राजगुरुनगर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, नवीन पोलीस ठाणे लवकरात लवकर पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.