चाकणमध्ये ८४ किलो गांजासह दोन तस्कर अटकेत, ५७.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण (कल्पेश अ. भोई) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात धडक कारवाई करत गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक स्कॉर्पिओ वाहन असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अंमली पदार्थांविरोधातील ही अलीकडील काळातील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून विविध भागांमध्ये गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सतत गस्त घालण्याचे काम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत पोलीस उपआयुक्त गुन्हे रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

पहाटेच्या सापळ्यात आरोपी जेरबंद

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अंमली पदार्थांविरोधात विशेष पथके तयार केली होती. ही पथके आयुक्तालयाच्या विविध भागांमध्ये गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निखिल वर्पे,आणि विजय दौंडकर यांना चाकण परिसरात संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाईची योजना आखली.

१८ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे चाकण येथील रुबी बेकरीजवळ, खंडोबा माळ परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित वाहन आणि व्यक्तींची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.

दोन आरोपी अटकेत कारवाई

दरम्यान पोलिसांनी अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय २४, रा. खंडोबामाळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक (वय २४, रा. शिवसाईनगर, सुतारदरा, कोथरूड, पुणे) या दोघांना ताब्यात घेतले. तपासा दरम्यान त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला.पोलिसांनी आरोपींकडून ४१ लाख ९८ हजार रुपयांचा ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, ७५ हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन, ५१० रुपये रोख रक्कम तसेच १५ लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

युवकांना लक्ष्य करणाऱ्या जाळ्याचा तपास सुरू

प्राथमिक तपासात आरोपी हे गांजा विक्री आणि पुरवठा साखळीशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाचा पुरवठा नेमका कुठून करण्यात आला, तो कोणत्या भागात विक्रीसाठी नेण्यात येणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून गांजा पुरवठादार आणि खरेदीदारांचे नेटवर्क समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ बाळगणे, वाहतूक करणे किंवा त्याच्या व्यापारात सहभागी होणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.या गुन्ह्याचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे करत असून आरोपींच्या पोलीस कोठडी दरम्यान आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवडचा ८६००००२३२० हा क्रमांक, पोलीस हेल्पलाईन ११२ तसेच ‘मानस’ हेल्पलाईन १९३३ उपलब्ध असून नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पथकाचे विशेष योगदान

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे, जिलानी मोमीन तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस शिपाई सुभाष गुरव आणि प्रकाश ननावरे यांनी विशेष मदत केली.

अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात

चाकण हे वेगाने विकसित होत असलेले औद्योगिक केंद्र असून येथे विविध राज्यांतून कामगार आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर येतो. अशा भागांमध्ये अंमली पदार्थांची अवैध तस्करी रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असते. या कारवाईमुळे गांजा तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला असून आगामी काळात अशाच धडक मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत गुन्हे शाखेकडून देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सहकार्याने अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलिसांचा लढा सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *