पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – दिघी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवघ्या १२ तासांत खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक येथे राहणाऱ्या शंकुतला काळुराम गिलबिले (वय ७५) या १६ जून रोजी घरात एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. याबाबत त्यांचे नातेवाईक राजेंद्र लालासाहेब गिलबिले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दिघी पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील नागरिकांची चौकशी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.
तपासा दरम्यान मयत महिलेच्या शेतात काम करणारा मजूर भगवान दगडुजी पाटील (वय ४८) याच्यावर संशय बळावला. पोलीस उपनिरीक्षक आबा कटपाळे व त्यांच्या पथकाने संभाजीनगर परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला गंगापूर तालुक्यातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास कामुनी, पोलीस उपनिरीक्षक आबा कटपाळे तसेच त्यांच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अवघ्या १२ तासांत आरोपीला जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याने दिघी पोलिसांच्या तपास कार्याचे कौतुक होत आहे.