तळेगाव दाभाडे, (प्रतिनिधी ) : तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी चोरी आणि तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १ लाख ४९ हजार रुपये किमतीचा १ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली असून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. १२ जून २०२६ रोजी मध्यरात्री इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध सुरू केला.
तपासा दरम्यान आरोपी चाकण परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या दोन पथकांनी शोधमोहीम राबवून कुणाल बाळू वीर (वय २३, रा. सुंबरेनगर, चाकण) आणि लोबो उर्फ सुर्या श्रीमंतहो दास (वय २६, रा. कडाचीवाडी, चाकण) यांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीत हेच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी तळेगाव दाभाडे व म्हाळुंगे परिसरातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून देवीचा १ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे आणि दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यांतील एकूण तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.या उल्लेखनीय कारवाईमुळे धार्मिक स्थळांवरील चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली.