पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील दारुबंदी पथकाने निगडी परिसरात रासायनिक भेसळयुक्त विषारी ताडी निर्मितीवर मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून सुमारे ४०० लिटर विषारी ताडी तसेच ताडी निर्मितीसाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ आणि साहित्य जप्त केले आहे.पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अवैध दारू, भेसळयुक्त मद्य व ताडी निर्मितीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहीदास पवार यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे दारुबंदी पथकाने ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे छापा टाकला. या ठिकाणी क्लोरल हायड्रेट (Chloral Hydrate) या रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम व विषारी ताडी तयार करून विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत ४०० लिटर भेसळयुक्त ताडी जप्त करण्यात आली.पोलीसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली ताडी मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून तिच्या सेवनामुळे गंभीर शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात. या प्रकरणी मौनेश यंकप्पा गुत्तेदार (वय २४, रा. पोरंडवाल चौक, देहूगाव, मूळ रा. रायचूर, कर्नाटक) आणि लक्ष्मण गुंडप्पा हुलसुरे (वय २६, रा. आंबेडकर नगर, देहूगाव, मूळ रा. निलंगा, जि. लातूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींविरुद्ध निगडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये करीत आहेत.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू निर्मिती किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व आरोग्यास धोकादायक व्यवसायांविरोधात कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.