चाकण, (कल्पेश अ. भोई ) : कंपनीमध्ये नेमकी चोरी कधी झाली याचा कालावधी निश्चित नसताना आणि तपासासाठी कोणतेही थेट धागेदोरे उपलब्ध नसतानाही महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत ३६ लाख रुपयांच्या बीअर स्टोअरेज टँक चोरीचा पर्दाफाश केला आहे.
तब्बल ६०० जीबीहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत कंपनीच्या माजी विश्वासू कामगारासह सहा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरीस गेलेल्या सर्व १० बीअर स्टोअरेज टाक्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
४० दिवसांनंतर चोरी उघडकीस : मौजे सावरदरी (ता. खेड) येथील चाकण-महाळुंगे औद्योगिक परिसरात ‘टाईने रिबेल’ या नावाने नवीन बीअर उत्पादन कंपनी उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीमधील अंदाजे ३६ लाख रुपये किमतीच्या १० लहान-मोठ्या बीअर स्टोअरेज टाक्या २० फेब्रुवारी ते ३० मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या.कंपनीचे प्रतिनिधी विवेक मारुती खैरे यांना ही बाब जवळपास ४० दिवसांनंतर लक्षात आली. चोरीचा नेमका दिवस निश्चित नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते.
पोलिसांचा कसून तपास : घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-४) श्रीमती श्वेता खेडकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासासंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे आणि त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.पोलिसांनी परिसरातील सुमारे ३० ते ३५ कंपन्यांचे दीड महिन्यांतील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपासले. तब्बल ६०० जीबीपेक्षा अधिक डेटा असलेल्या या फुटेजमधून संशयास्पद हालचाली करणारी एक क्रेन आणि ट्रक पोलिसांच्या नजरेस पडला.
माजी कामगारच निघाला सूत्रधार : तपासादरम्यान कंपनीतील विद्यमान आणि माजी कामगार, भागीदार तसेच आर्थिक गुंतवणूकदार यांच्या हालचालींचीही माहिती घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषणातून संशयित क्रेन, ट्रक चालक आणि कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे यांच्यातील संपर्क उघड झाला.पोलिसांनी प्रसाद राजळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीचा कट रचल्याची कबुली दिली. कंपनीच्या कामकाजाची आणि परिसराची पूर्ण माहिती असल्याने त्याने इतर साथीदारांच्या मदतीने टाक्या चोरी करून विक्रीसाठी पाठवल्याचे समोर आले.
पुणे आणि ठाण्यातून मुद्देमाल हस्तगत : मुख्य आरोपीच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी चोरीच्या टाक्या वाहून नेणारे आणि त्यांची खरेदी-विक्री करणारे इतर पाच आरोपींना अटक केली. कुदळवाडी (चिखली, पुणे) आणि मुंब्रा (ठाणे) येथील विविध ठिकाणी छापे टाकून चोरीस गेलेल्या सर्व १० स्टील बीअर स्टोअरेज टाक्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ३६ लाख रुपये आहे.अटक आरोपीया प्रकरणात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे :प्रसाद विनोद राजळे (२९, पिरंगुट, ता. मुळशी) – मुख्य सूत्रधार व माजी कामगारचंदन अर्जुन सिंग (३८, कुदळवाडी, चिखली)अली अहमद चौधरी (३२, कुदळवाडी, चिखली)फिरोज असगर अली खान (३८, मोशी)किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता (२४, कुदळवाडी, चिखली)नियाज मोहम्मद इसराईल (५१, मुंब्रा, ठाणे)या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाच्या कामगिरीचे कौतुकही उल्लेखनीय: कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्यासह राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, मंगेश कदम, गणेश गायकवाड, संतोष बायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, साहिल सांडभोर, मंगेश घोलप आणि समीर महत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कमी धागेदोरे असलेल्या या गुन्ह्याची यशस्वी उकल करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.