पुणे विषारी दारूकांड: एकूण १५ जणांचा मृत्यू; प्रकरणाचा तपास आता ‘सीआयडी’कडे वर्ग

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पुणे (प्रतिनिधी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूं प्रकरणी आता ‘राज्य गुन्हे अन्वेषण विभाग’ (CID) मैदानात उतरला आहे. हडपसर आणि दापोडी भागात घडलेल्या या भीषण घटनेत आतापर्यंत एकूण १५ जणांचा बळी गेला असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांनी या गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे.

नेमकी घटना काय?

मे महिन्याच्या अखेरीस दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी दारू पिल्याने नागरिकांना त्रास होऊ लागला होता. या विषबाधेमुळे दापोडी परिसरातील ११ व्यक्तींचा, तर हडपसर परिसरातील ४ व्यक्तींचा अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.गुन्हे दाखल आणि अटक सत्र:या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात (गु.रजि.नं. ११४/२०२६) आणि हडपसर पोलीस ठाण्यात (गु.रजि.नं. ३७९/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, ११०, १२३, १२५, २७५ आणि ३(५) सह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दापोडी पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

तपास सीआयडीकडे का वर्ग केला? या घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य मोठे असल्याने, सखोल तपासासाठी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी २९ मे २०२६ रोजी हे दोन्ही गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ३१ मे पासून सीआयडीने अधिकृतपणे या तपासाची सुत्रे हाती घेतली आहेत.

या विषारी दारूचा साठा कुठून आला? याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? या सर्व बाबींचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे करत असल्याची माहिती विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *