पिंपरी-चिंचवड पोलिसांचा हातभट्टी दारू अड्ड्यांवर मोठा प्रहार; मावळ, खेड आणि चाकण परिसरातून लाखो रुपयांचे रसायन जप्त

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पिंपरी: बनावट आणि विषारी दारूमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील शिरगाव, चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत लाखो रुपयांचे कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले असून, ग्रामीण भागातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

शिरगाव आणि पवना नदीकाठी मोठी कारवाईशिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ मे रोजी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेलगत आणि पवना नदीकाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. एक्सप्रेसवे जवळील एका खड्ड्यात लपवून ठेवलेले १ लाख ४० हजार रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर पवना नदीकाठी ओझर्ड आणि शिरगाव परिसरात केलेल्या कारवाईत अनुक्रमे १० हजार आणि ११ हजार लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले. या दोन्ही ठिकाणच्या रसायनाची किंमत अंदाजे ७ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांची चाहूल लागताच या ठिकाणच्या महिला आरोपी पसार झाल्या असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

म्हाळुंगे आणि चाकण परिसरातही अटक व जप्ती दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी निघोजे परिसरातील डोंगरवस्तीवर छापा टाकून हातभट्टी दारू जप्त केली. याप्रकरणी ५३ वर्षीय इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच, चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ गावातील पठारे वस्ती येथे गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने धडक कारवाई केली. येथे ८०० लिटर कच्चे रसायन आणि प्लास्टिकचे ड्रम जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विषारी दारूच्या पार्श्वभूमीवर कारवाई कडक नुकतेच फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात बनावट आणि विषारी दारू पिल्याने १३ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अवैध दारू माफियांना जरब बसवण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

फरार आरोपींचा शोध सुरूया सर्व कारवायांमुळे अवैध दारू गाळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई दरम्यान फरार झालेल्या आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्रामीण भागातून दारूचा नायनाट करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे आणि माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *