पुण्यातील तीन जणांनी संगनमताने जुन्नर नगरपरिषद आणि संभाजीनगर येथील ठेकेदार यांची केली बनावट बँक खात्याद्वारे आर्थिक फसवणूक

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जुन्नर (प्रतिनिधी ) जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने शहरात ११० हायमास्ट दिवे बसवण्याचे काम मिळालेल्या संभाजीनगर येथील खाजगी कंपनी मालकाची तीन जणांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार करून, बँकेत बनावट खाते उघडून जुन्नर नगरपरिषदेचा विश्वास संपादन करीत खोटी सही करून केलेल्या कामाच्या बिलापोटी १ कोटी ८५ लाख ३६००० इतकी रक्कम खात्यावर वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल फिर्यादीनंतर तीन जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता विविध कलमानुसार जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत पांडुरंग जाधव (वय ४७ वर्षे रा. संभाजीनगर) यांनी १० मार्च २०२४ ते २९ जुलै २०२५ या कालावधीत जुन्नर नगरपरिषदेमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद २५ मे २०२६ रोजी दाखल केली आहे. त्यानुसार १) सुजित भानुदास घोडके २) बाळासाहेब गुलाब गायकवाड ३) परशुराम निवृत्ती शेलार सर्व रा. पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे. बालाजी इंटरप्राईजेस संभाजीनगर या फर्मला जुन्नर मध्ये ११० हायमास्ट दिवे बसविण्याचे काम ऑक्टोबर २०२४ मध्ये जुन्नर नगरपरिषदेने दिलेले होते. या कामाची एकूण रक्कम ५ कोटी ८८ लाख ९९ हजार रुपये होती. आवश्यक वजाबाकी करून त्यांना ही रक्कम मिळणार होती. यावेळी सुजित घोडके यांनी हे काम मी पूर्ण करून देतो असे जाधव यांना सांगून कामगार, कच्चा मालपुरवठा, कामावर देखरेख, कामाची गुणवत्ता याबाबतचे ठराव या दोघांत करण्यात आले होते. या देण्यात आलेल्या कामापैकी दोन कामांची रक्कम जाधव यांना नगरपरिषदेकडून मिळाली होती. राहिलेल्या दोन कामांची २ कोटी १९ लाख २४ हजार रुपये इतकी रक्कम काम पूर्ण होऊनही मिळाली नाही याबाबत नगरपरिषदेकडे विचारणा केली असता या रकमेतून शासकीय वजावट करून १ कोटी ८५ लाख ३६४४० रुपये आरटीजीएस द्वारे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अभिजित जाधव यांनी या बँक खात्याची माहिती घेतली असता सदर खाते सुजित घोडके याचे सासरे बाळासाहेब गुलाब गायकवाड यांचे नावाने असल्याचे स्पष्ट झाले. तर या खात्याचा मोबाईल नंबर बाळासाहेब गायकवाड याचा असल्याची त्यांना माहिती मिळाली. सुजित व बाळासाहेब यांनी संगनमत करून परशुराम यांचे नावे पुण्यातील नऱ्हे येथील एका बँकेत खाते उघडून तेथे १ कोटी ८५ लाख ३६४४० रुपये या बनावट खात्यामध्ये फसवणूक करीत वर्ग करून घेतली. या तिघांनी मिळून संगनमताने जुन्नर नगरपरिषद आणि अभिजीत जाधव यांची आर्थिक फसवणूक केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश तिटमे करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *