भीमाशंकर खेड तालुक्यातच राहावे; ‘खेड-आंबेगाव’ उल्लेखावरून नागरिक आक्रमक, शासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण (प्रतिनिधी ):श्रीक्षेत्र भीमाशंकर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या खेड तालुक्याचा अविभाज्य भाग असून, ते कायमस्वरूपी खेड तालुक्यातच राहावे,अशी मागणी भगवान मेदनकर (अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,खेड तालुका चाकण मंडल )यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.

या मागणीसाठी खेड तालुक्यातील जनभावना तीव्र झाल्या आहेत. अलीकडेच एका वरिष्ठ समितीच्या बैठकीत भीमाशंकरचा उल्लेख “खेड-आंबेगाव” असा केल्याची माहिती समोर आल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, याविरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.श्रीक्षेत्र भीमाशंकरचे स्थान केवळ धार्मिक महत्त्वाचे नसून ते खेड तालुक्याच्या अस्मितेशी जोडलेले आहे.

अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी भीमाशंकर खेड तालुक्यातच राहावे यासाठी लढा दिला आहे. मात्र, शासनाच्या शिखर समितीच्या बैठकीत “भीमाशंकर खेड-आंबेगाव” असा संयुक्त उल्लेख करण्याबाबत चर्चा झाल्याने खेडमधील जनतेमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अस्मितेचा प्रश्न आणि भविष्यातील धोकातालुक्यातील नागरिकांच्या मते, जर शासनाच्या अधिकृत कार्यवृत्तात किंवा महसुली नोंदींमध्ये अशा प्रकारचा बदल किंवा संयुक्त उल्लेख झाला, तर भविष्यात त्याचे गंभीर प्रशासकीय आणि भौगोलिक परिणाम होऊ शकतात. यामुळे खेड तालुक्याच्या भौगोलिक सीमांवरील हक्कावर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जनतेची मागणी काय?

खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने आणि विविध संघटनांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:1. श्रीक्षेत्र भीमाशंकरचा उल्लेख केवळ ‘खेड तालुका’ असाच अधिकृत राहिला पाहिजे.2. ‘खेड-आंबेगाव’ असा उल्लेख करून जनतेची दिशाभूल थांबवावी.3. प्रशासनाने जनभावनांचा आदर करून या विषयात तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा.

“भीमाशंकर हे खेड तालुक्याचे भूषण आहे. ऐतिहासिक काळापासून ते या तालुक्याचा भाग आहे. राजकीय किंवा प्रशासकीय सोयीसाठी लोकभावनेचा बळी दिला जाऊ नये,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.आता या संवेदनशील विषयावर शासन आणि संबंधित मंत्रालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *