जुन्नर तालुक्यात भीषण एसटी अपघात : चालकासह दोघांचा मृत्यू, १८ प्रवासी गंभीर जखमी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

जुन्नर( प्रतिनिधी )पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रविवारी सायंकाळी अत्यंत भीषण रस्ते दुर्घटना घडली. गुंजाळवाडी परिसरात प्रवाशांनी भरलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बस खोल ओढ्यात कोसळून पलटी झाल्याने चालकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भिवंडी आगाराची बस क्रमांक एमएच १४ बीटी ४०२३ ही शेगावहून कल्याणच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघाली होती. रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही बस गुंजाळवाडी गावाच्या हद्दीत पोहोचली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न चालकाने केला. मात्र अचानक वळण घेताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्यालगतच्या खोल ओढ्यात कोसळली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ओढ्यात कोसळल्यानंतर बस दोन ते तीन वेळा पलटी झाली. या भीषण धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांचा आक्रोश आणि मदतीसाठी सुरू झालेली धावपळ पाहून परिसरातील नागरिक हादरून गेले.

या भीषण अपघातात एसटी बसचे चालक मोहम्मद एल. वाय. सलीम (वय ४५, रा. अमरावती) तसेच प्रवासी प्रशांत साईनाथ होणशेटे (वय २७, रा. बेल्लार, नांदेड) यांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघातात कोंडीभाऊ वाकचौरे, कमल वाकचौरे, शंकर शेजाळ, वैशाली शेजाळ, मगन पाटोळे, शोभा पाटोळे, शारदा मेंगळे, अश्विनी बहिरट, अलका गायकवाड, अरुण गुंजाळ, दिपाली डोंगरे, उल्हास तांबे, यमुना पावसे, दिव्या पवार, सिद्धेश काळे, आशा काळे आणि नितीन काळे यांच्यासह एकूण १८ प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच गुंजाळवाडी परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता ओढ्यात उतरून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. अनेकांना काचा फोडून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणी पुढील तपास विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.या दुर्घटनेनंतर एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, घाटमाथा आणि ग्रामीण भागातील धोकादायक रस्त्यांवर अधिक सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *