
रोखठोक मराठी बातम्या
पुणे/रांजणगाव: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता गुन्हे विरोधी पथक आणि एका अट्टल गुन्हेगाराच्या टोळीमध्ये रांजणगाव परिसरात थरारक चकमक झाली. अटकेच्या भीतीने आरोपींनी पोलिसांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पोलीस पथकाने स्वसंरक्षणार्थ चार राऊंड फायर केले. या चकमकीत मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव आणि त्याचा साथीदार ऊसाच्या शेताचा फायदा घेऊन पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
घटनेची पार्श्वभूमी: दिघीतील गोळीबार या थराराची सुरुवात १३ मे २०२६ रोजी झाली होती. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इसमावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तपास केला असता, रेकॉर्डवरील गुन्हेगार शेखर संभाजी जाधव आणि त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.न्या.सं. आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा (रजि. नं. २१५/२०२६) दाखल करण्यात आला होता.तात्रिक विश्लेषण आणि शोधमोहीम मालमत्ता गुन्हे विरोधी पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
या दरम्यान आरोपी शेखर जाधव हा रांजणगाव परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती १६ मे रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस हवालदार प्रवीण कांबळे, विशाल गायकवाड, पोलीस शिपाई विनोद वीर, गणेश सावंत आणि गुंडा विरोधी पथकाचे सपोफो मेदगे यांचे पथक तातडीने खाजगी वाहनाने रांजणगावच्या दिशेने रवाना झाले.
रस्त्यावर थरार आणि फिल्मी पाठलाग पोलीस पथक रांजणगाव पोलीस ठाण्याची मदत घेण्यासाठी जात असताना, त्यांना रस्त्याच्या कडेला शेखर जाधव त्याच्या साथीदारासह स्प्लेंडर मोटरसायकलवर दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पळ काढला. पाठलाग सुरू असताना शेखरच्या चिथावणीवरून त्याच्या साथीदाराने पोलिसांना दोन-तीन वेळा पिस्तूल दाखवून ‘पाठलाग करू नका’ असा इशारा दिला.
गुन्हेगाराचा गोळीबार आणि पोलिसांचे प्रत्युत्तर सायंकाळी ६:३० च्या सुमारास सोनी सांगवी गावातील हॉटेल यशराज जवळ आरोपींनी आपली दुचाकी सोडून ऊसाच्या शेतात धाव घेतली. पोलीस त्यांच्या मागे धावत असतानाच, शेखर जाधवने ओरडून आपल्या साथीदाराला सांगितले की, “या पोलिसांना ठोक!” . या चिथावणीनंतर आरोपीने पोलिसांच्या दिशेने थेट दोन राऊंड फायर केले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि स्वसंरक्षणार्थ सपोनि बालवडकर यांनी आपल्या सरकारी पिस्तूलमधून आरोपींच्या दिशेने चार राऊंड फायर केले. या गोळीबारात आरोपी जखमी झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सायंकाळची वेळ आणि ऊसाच्या दाट शेताचा फायदा घेत दोन्ही आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.
मोठी शोधमोहीम सुरू या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे विशेष पथक आणि पुणे ग्रामीणच्या रांजणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरोपींच्या शोधासाठी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवत आहेत. या घटनेबाबत रांजणगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा (रजि. नं. २१६/२०२६) दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

