नॅनो पार्टिकल संशोधनातून डॉ. ऋषीकेश खोडदे यांना पीएच.डी.; कॅन्सर उपचार संशोधनाला नवी दिशा

Spread the love

रोखठोक मराठी बातम्या

चाकण (प्रतिनिधी)चाकण गावातील आदर्श शिक्षक हरिभाऊ सहादू खोडदे यांचे सुपुत्र डॉ. प्रा. ऋषीकेश हरिभाऊ खोडदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विज्ञान शाखेत नॅनो पार्टिकल (Nanoparticle) विषयावर संशोधन पूर्ण करून पीएच.डी. ही मानाची पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चाकण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डॉ. ऋषीकेश खोडदे यांनी नॅनो तंत्रज्ञान आणि वनस्पतीशास्त्राशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संशोधन केले. आधुनिक विज्ञान क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या नॅनो पार्टिकल तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकीय, औषधनिर्मिती तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच क्षेत्रात त्यांनी सखोल अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत आणि संशोधनात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर उल्लेखनीय कार्य केले.त्यांच्या संशोधन प्रवासात त्यांनी तब्बल ६ पेटंट्स नोंदवले असून ४ आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या संशोधनाचा उपयोग भविष्यात कॅन्सर उपचार पद्धती अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी होऊ शकतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनाकडे विज्ञान क्षेत्रात विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रा. डॉ. दीपक शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सह-मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. अमोल सोनवणे यांनी संशोधन प्रक्रियेत विशेष सहकार्य केले. दोन्ही मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. खोडदे यांनी आपला संशोधन प्रबंध यशस्वीरित्या पूर्ण केला.डॉ. ऋषीकेश खोडदे यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, विज्ञान तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. चाकणसारख्या ग्रामीण भागातील युवकाने जागतिक स्तरावरील संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.त्यांच्या या यशामुळे चाकण परिसराच्या शैक्षणिक आणि संशोधन परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून भविष्यातही ते विज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *