भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आशाताई बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यावर शोककळा

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

जुन्नर : (प्रतिनिधी ) जुन्नर तालुक्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी जिल्हा परिषद सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आशाताई दत्तात्रय बुचके (वय ६१) यांचे रविवारी, दि. १३ सप्टेंबर रोजी पहाटे मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.आशाताई बुचके यांनी पुणे जिल्हा परिषदेत सलग चार वेळा सदस्य म्हणून काम केले. तसेच जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न, विकासकामे, पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विषयांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला.आशाताई बुचके यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली.

सुमारे १५ वर्षे शिवसेनेत काम केल्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.जुन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली होती. आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि लढाऊ महिला नेत्या म्हणून त्यांनी जुन्नरच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा जनसंपर्क मजबूत होता. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याने एक अनुभवी आणि लढाऊ महिला नेतृत्व गमावले आहे.आशाताई बुचके यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.आशाताई बुचके यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या कार्याची आणि संघर्षमय राजकीय वाटचालीची आठवण कायम राहील.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *