दरोड्याचा गुन्हा उघड; सहा सराईत आरोपी जेरबंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट-४ची उल्लेखनीय कामगिरी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पिंपरी-चिंचवड : गहुंजे येथे रिक्षा आडवी लावून तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडील ९० हजार रुपयांची रोकड लुटल्याच्या गंभीर गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४ने छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सहा सराईत आरोपींना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

२१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता फिर्यादी हे लोढा सोसायटी, गहुंजे येथे ऑर्डर देऊन झेपटो स्टोअरसमोरून गहुंजे स्टेडियमच्या दिशेने जात होते. त्यावेळी अनोळखी आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलला रिक्षा आडवी लावली. त्यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने रिक्षात बसवून मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळील मैदानात नेण्यात आले. तेथे मारहाण करून त्यांच्याकडील ९० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन आरोपी फरार झाले.या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), १२६ (२), १३७ (२), ३ (५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या युनिट-४च्या पथकाने तपास सुरू केला. आरोपींबाबत सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने तपासासमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी घटनास्थळापासून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षेचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच संशयितांचे सीडीआर, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

या तपासातून पोलिसांनी सुरज शंकर चलवादी (वय २४), दीपक दयानंद भंडगे (वय २४), अविनाश अरुण वानखेडे (वय २६), प्रथमेश ऊर्फ प्रतीक हरिभाऊ कंक (वय २७), विराज ऊर्फ सनी युवराज हिरवे (वय १९) आणि ईसाक राजू काजापुरम (वय २८) या सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले आरोपी सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी दरोडा आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले तसेच गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *