महाराष्ट्रातील उद्योगांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा; एमआयडीसीच्या कारभारावर गंभीर आरोप

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज चाकण : महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची सद्यस्थिती आणि एमआयडीसी प्रशासनाच्या कारभारावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी उद्योगांचे स्थलांतर, रोजगाराचा प्रश्न, पायाभूत सुविधांची दुरवस्था आणि प्रशासनातील कथित भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले.

“उद्या उद्योगमंत्री येतील, मोठ्या घोषणा करतील; मात्र प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. त्यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, कचरा आणि वीजपुरवठ्यासह विविध समस्यांची पाहणी केली.राज्यातील ३५,३०० उद्योग बंद किंवा स्थलांतरित झाल्याचा दावाआदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील सुमारे ३५,३०० उद्योग बंद पडले अथवा राज्या बाहेर स्थलांतरित झाले आहेत. याचा थेट परिणाम रोजगाराच्या संधींवर झाला असून, सध्या आणखी सुमारे २० उद्योजक राज्य सोडण्याच्या विचारात असल्याचा दावाही त्यांनी केला.

“राज्यातील उद्योग टिकवणे आणि नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरून सरकारला घेरले देशातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरूनही ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची गरज असताना उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांची संख्या त्यापेक्षा कमी असल्याचा दावा करत त्यांनी, “उर्वरित तरुणांनी रोजगारासाठी कोणाकडे जायचे?” असा सवाल उपस्थित केला.

एमआयडीसी परिसरातील मूलभूत सुविधांकडेही त्यांनी लक्ष वेधले. औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून वीजपुरवठ्याचा प्रश्नही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकसह अन्य औद्योगिक भागांतही अशाच समस्या असल्याचा दावा करत प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका त्यांनी केली.

“प्रोटोकॉल बाजूला ठेवून परिस्थिती पाहावी” उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आगामी दौऱ्यावर भाष्य करताना ठाकरे यांनी त्यांना प्रोटोकॉल बाजूला ठेवून औद्योगिक भागातील वास्तव पाहण्याचे आवाहन केले.“नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील, तर प्रोटोकॉल आणि सुरक्षेचा बडेजाव बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे एमआयडीसी परिसरात फिरावे,” असे ठाकरे म्हणाले.

एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या कारभारावरही त्यांनी गंभीर आरोप केले. प्रशासनातील प्रत्येक कामासाठी कथितरीत्या दर ठरलेले असल्याचा दावा करत त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली.चाकणसाठी सक्षम अधिकाऱ्याची गरजचाकण एमआयडीसी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम आणि कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

“चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.या वेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषदेतील गटनेते विजय शिंदेपाटील, विनया मुंगसे, तनुजा घनवट, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, शिवाजी वरपे, सुरेश भोर, अमोल पवार, सुधीर मुंगसे, रुपाली कांबळे, दिलीप डुबे, अर्जुन गोगावले, सुभाष मांडेकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *