
रोखठोक मराठी न्यूज
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा आणि श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या १९५ व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठका पार पडल्या. पालखी मार्ग, मंदिर परिसर, वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक नियोजन करण्यात आले.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३४१ वा पालखी प्रस्थान सोहळा ७ जुलै २०२६ रोजी, तर श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा १९५ वा पालखी प्रस्थान सोहळा ८ जुलै २०२६ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजक, विश्वस्त आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित करण्यात आल्या.
तुकाराम महाराज पालखी सोहळ्या बाबत बैठक
दिनांक १८ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह उमराज मोरे, लक्ष्मण दत्तात्रय मोरे, उमेश सुरेश मोरे, विश्वस्त दिलीप नारायण मोरे, गणेश उत्तम मोरे आणि वैभव आशोक मोरे उपस्थित होते.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या संदर्भात बैठक
दिनांक २३ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र बाबुराव उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ गुरु शांतिनाथ, चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा), अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम मुरलीधर पाटील, ज्ञानेश्वर वीर तसेच दिंडी मालक राजेंद्र बाळासाहेब पवार (अफळाकर) उपस्थित होते.
वाहतूक, सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनावर भर
दोन्ही बैठकींमध्ये पालखी प्रस्थान सोहळा, मंदिर परिसर आणि पालखी मार्गावरील संभाव्य अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, पर्यायी मार्गांची आखणी, दिंडीसोबत असणाऱ्या वाहनांचे नियोजन आणि वारकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी समन्वय ठेवण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.याशिवाय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला.भक्तीमय वातावरणात सोहळा पार पाडण्याचा निर्धारया वेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व वारकऱ्यांची सुरक्षितता आणि सोहळ्याचे पावित्र्य जपणे ही पोलीस प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे सांगितले.
प्रशासन, मंदिर संस्थान, विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि वारकरी यांच्यातील समन्वयातून संपूर्ण पालखी सोहळा शांततेत, सुरक्षिततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बैठकी दरम्यान विश्वस्तांनी मांडलेल्या विविध सूचना आणि मागण्यांची नोंद घेऊन पूर्वतयारीसाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच दोन्ही पालखी सोहळ्यांच्या विश्वस्तांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित या बैठकींसाठी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड (गुन्हे), बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, संदीप आटोळे, रोहीदास पवार, मारुती जगताप, धीरज पाटील, विक्रांत देशमुख यांच्यासह विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी यंत्रणा सज्ज
आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले असून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तीमय वातावरणात वारी सोहळा पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

